Tuesday, December 28, 2010

आजीच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त लिहिण्याचा केलेला छोटासा प्रयत्न

आजी!! हे नाव उच्चारले कि चार फुटाची मूर्ती डोळ्यासमोर येते.मूर्ती म्हणाले म्हणून हसू आलं ना!! पण खरच,मूर्ती लहान पण कीर्ती महान असाच व्यक्तिमत्व आहे आजीचं.आज तिची पंच्याहत्तरी साजरा करण्याचा आनंदाचा दिवस.
जन्म कोकणात देवगड-वाडा पडेल येथे झाला.एकत्र कुटुंबात वाढलेली.त्या काळात शिक्षणाची सोय नसल्यामुळे आणि परिस्थिती नसल्यामुळे शिक्षण फक्त सही करण्यापुरते व पेपर वाचण्यापुरतेच.लग्न झाल्यानंतर मुंबईत गिरगाव येथे पेठे बिल्डिंग मध्ये राहावयास आली.तिथेही दहा बाय बारा च्या खोलीत सासू सासरे आणि इतर नऊ-दहा माणसे.त्यातच पै पाहुणे असायचेच.परिस्थिती एकंदरीत गरिबीचीच.त्यातच मुलींचे शिक्षण चालू होते.अशातच एक जोशी नावाचे गृहस्थ आले.ते पायाने अधू होते.त्यांनी आजीला सांगितले कि मला रोज दोन्ही वेळेस जेवायला वाढा.मीच तुमचा पहिला मेम्बर होतो व advance देतो.अशा प्रकारे तिचा खानावळीचा धंदा सुरु झाला जो एवढा वाढला कि पन्नास ते साठ मेम्बर्स रोज दोन्ही वेळेस जेवायला असायचे.कष्ट फारच होते.पण न डगमगता तिने ते कुटुंबासाठी केले.त्यातूनच तिचा सगळा संसार झाला.दोन्ही मुलींची लग्न कार्य,बाळंतपण,मंगळागौरी,पुतण्या-पुतणी,सुनेचे कौतुक तिथेच झाले.एवढा कामाचा उपद्व्याप सांभाळून पाच दिवस गणपती,नवरात्र सगळी धार्मिक कार्ये अगदी उत्साहाने पार पाडली.बिल्डिंग जुनी असल्यामुळे एका बाजूची भिंत पडल्यावर टेकू लावून धंदा तसाच जोमाने चालू ठेवला.जेवायला येणाऱ्या लोकांनीही चांगली साठ दिली.अडी-अडचणीच्या वेळेस आधार दिला.
आज वयाच्या पंच्याहत्तर व्या वर्षात पदार्पण करताना भल्याभल्यांना अगदी आम्हा तरुण मंडळीना लाजवेल असा तिचा उत्साह आजही टिकून आहे.माझे सर्वात जास्त लाड कोणी केले असतील,सगळे हट्ट कोणी पुरवले असतील तर ते आजीने.लहानपणी वयाच्या अडीच वर्षापर्यंत मी तिच्याकडेच वाढले.तिची खानावळ सांभाळून एका छोट्याशा खोलीत मोठ्या आनंदाने सगळ्यांचे आदरातिथ्य करायची,अजूनही करते.कोणीही येतो म्हंटले कि या या,मी वाट बघत्ये असा हसतमुखाने सांगते.तिच्याकडे पैशांची श्रीमंती नसली तरी माणसांची श्रीमंती प्रचंड आहे इतकी माणसे जिकडे जाईल तिकडे जोडून ठेवली आहेत तिने.गिरगावात काळे काकू आणि इथे काळे आजी म्हणूनच ओळखतात सगळे.सगळ्या नातवंडांवर तिचे अतोनात प्रेम.आम्हाला कोणी बोलले किंवा ओरडले तर तिला ते मुळीच सहन होत नाही.पण आमची बाजू घेतल्यामुळे तिलाच ओरडा मिळतो ते वेगळा.मी म्हणते ते बरोबर आहे ना हर्शल.आठवतोय का आमच्याकडे घडलेला किस्सा तुझ्या अभ्यासावरून.आणि आई आणि मामी ह्या गोष्टीला पुरेपूर सहमत असतील हो ना.!! .एक किस्सा मलाही आठवतो.आयुष्यात एकदाच मी मार खाल्ला होता तिचा.आणि तेव्हा भयंकर रागही आलं होता.अर्थात ते योग्यच होतं.असो.माझ्यापेक्षा आजीच हा किस्सा जास्त चांगला सांगू शकेल.काय आजी ?
सगळ्या संकटाना धेर्यान समोर कसा जावं हे तिच्याकडून शिकावं.२००५ साली जेव्हा अक्खी मुंबई जलमय झाली होती तेव्हा आजीचं घरही पाण्यात बुडून गेल.सगळ होत्याचं नव्हतं झालं.तेव्हाही न डगमगता सगळं घर पुन्हा उभा केला.केवळ तिची पुण्याई किवा स्वामींच पाठबळ म्हणून ती वाचली.स्वामींवर तिची खूप श्रद्धा.म्हणूनच कि काय गिरगाव सोडून इथे राहायला आल्यावर तिच्याच बाजूला स्वामीचा मठ स्थापन झाला.कुठेही कोणाकडेही गेली तरी स्वस्थ बसणार नाही.कामाची भयंकर आवड.खानावळ बंद झाली तरी स्वयंपाकाची कामे अजूनही बंद झालेली नाहीत.या तिच्या कर्तुत्वाचा आम्हाला खूप अभिमान आहे.कोणावर अवलंबून राहणं तिला आवडत नाही आणि आवडणार नाही असा स्वाभिमानी स्वभाव आहे.अन्नपूर्णेचा वरदहस्त असल्यामुळे सगळेच पदार्थ अगदी वाखाण्य्यासारखे असतात.
शिकण्यासारख बराच काही आहे तिच्याकडून.आणि बोलण्यासारख सुद्धा.इतका कि हा दिवस कमी पडेल.एकाच मागणं आहे देवाकडे कि आजीला असाच उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू दे.सगळ्या pantvandana खेळवायचं आहे ना!! आम्हा सर्वांच्या सदिच्छा आहेत तिच्या पाठीशी.सगळ्या नात्यांना बांधून ठेवणारी गाठ आहे ही,कधीच सुटू नये हीच देवाकडे प्रार्थना.

Wednesday, March 25, 2009